पळसगाव पाटीजवळील भूमी कंपणी जवळ सुरु होता जुगार…
——————–
प्रतिनिधी :
——————–
वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली व वसमत ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत छापा टाकला. या कारवाईत ९ लाख ७९ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ८ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई गुरुवारी ता.१२ रात्री ११ च्या सुमारास केली.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलम रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली व पोलीस ठाणे वसमत ग्रामीण यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, वसमत ग्रामीण हद्दीत पळसगाव पाटीजवळील भूमी कंपनीच्या बाजूला काही जण जुगार खेळत आहेत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे ग्रामीण पोलीस ठाण्याचे साहेब पोलीस निरीक्षक गजानन बोराटे व स्थानिक गुन्हा शाखा हिंगोलीचे शिवशंभ घेवारे यांच्या पथकाने रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग सुरू असताना त्या ठिकाणी छापा टाकला असता काही जण गोलाकार बसून यांना म्हणा नावाचा जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ८ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम २४ हजार २६० रुपये, ९ मोबाईल फोन तसेच एक इरटिगा कार असा एकूण ९ लाख ७९ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी अवैध धंद्यांवर मोठी कारवाई केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी वसमत राजकुमार केद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पुढील काळातही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलम रोहन यांनी सांगितले.


