सरसकट कर्जमाफीची मागणी, वसमत तालुका सरपंच, उपसरपंच संघटनेचे प्रशासनाला निवेदन…
———————-
प्रतिनिधी :
———————-
परतीच्या पावसाने थैमान घातल्यानंतर वसमत तालुक्यातील आख्खे शेत शिवार पाण्याखाली गेले. परिणामी शेती पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून सरसकट ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये जाहीर करुन सरसकट कर्जमाफीची करावी यासाठी वसमत तालुक्यातील तब्बल 41 ग्रामपंयतीने ठराव घेतले आहेत. बुधवार ता.24 वसमत तालुका सरपंच व उपसरपंच संघटनेच्या वतीने सदरील ठराव व मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयात देण्यात आले.
यावर्षी परतीच्या पावसाने हाहाकार उडवला. अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच नदी, ओढ्याला पूर आलेने पिकांबरोबर शेतातील माती खरडून गेली आहे. आता शेतकऱ्यांच्या हातात काहीच लागणार नसल्याने शासनाने पंचनामे न करता ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी. त्याबरोबरच अतिवृष्टीमुळे हाती आलेला घास हिरावल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी यापुढे मुलांच्या शिक्षणाचा, कुटूंबाच्या, उदरनिर्वाहाचा, मुलांच्या विवाहाचा व वैद्यकीय उपचारासाठीच्या आर्थिक तरतुदींचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने शासनाने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी सरपंच व उपसरपंच संघटनेच्या वतीने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केली आहे. निवेदनावर सरपंच रमेश दळवी डोनवाडा , पुनमताई प्रमोदराव नादरे, गौतम नामदेव ढेंबरे दाभडी, प्रकाश मगरे पार्डी बु, तातेराव कोरडे लहान, गजानन ढोरे वाखारी , सीमाताई कदम पांगरा सती, शोभाताई करवंदे मुडी, बंडू व्यवहारे भेंडेगाव , शेख यासीन टेंभूर्णी , दौलत हुबाड मरलापुर, सुरेखाताई अंभोरे सुकळी , भागवत शिंदे पांगरा शिंदे, सोपान शिंदे , सतीश कुसळे खांडेगाव, ज्योतीताई रवंदळे थोरावा , दिपालीताई मोरे दगडपिंप्री , संभाजी डाखोरे पळसगाव यासह विविध गावच्या सरपंच उपसरपंच यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


