घरफोडीची आठवड्यातील दुसरी घटना , शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल…
——————–
प्रतिनिधी :
——————–
घरी कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी कुलुपबंद दरवाजा तोडून कपाटातील १ लाख ४२ हजार ९१६ रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने लंपास केल्याची घटना रवीवार ता.२ शहरातील स्वानंद कॉलनीत मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात सोमवार ता.३ अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील स्वानंद कॉलनीत मारोती मलीकार्जुन स्वामी वय ५० हे किरायाने राहतात. ते कुटुंबीयांसह रविवारी ता.२ सकाळी ४ वाजता मुलीच्या मेडीकलच्या ऍडमिशन साठी अहिल्यानगर येथे गेले होते. दरम्यान दिवसभर काम झाल्यावर ते परत निघाले व सोमवारी सकाळी ४ च्या सुमारास वसमत येथे पोहचले. घरी गेल्यावर त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसले तसेच आतमध्ये प्रवेश केला असता कपाट उघडलेले व आतील सामान अस्ताव्यस्त दिसले.आतमध्ये पाहिले असता लॉकर मध्ये ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने गायब दिसले. चोरी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर श्री स्वामी यांनी घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक सुधिर वाघ, पोलिस उपनिरीक्षक श्री कसबेवाड , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालाजी मिराशे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांनी आतमधील सोन्या-चांदीचे दागिने पळवल्याचे समोर आले. यात अडीच तोळे वजनाचे चांदीचे जोडवे ५०० रुपये, ४.८७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके २४,३५० रुपये, १ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या काड्या ५००० रुपये, १ ग्रॅम वजनाचे सोन्याचे २० मनी ५००० रुपये, ३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी १५,००० रुपये, ९.८ ग्रॅम वजनाचे चांदीचे जोडवे १९६ रुपये, १८.५०० ग्रॅम वजनाची चांदीची चैन ३७० रुपये, २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र १०,००० रुपये, १.५३० ग्रॅम वजनाचे २ मंगळसूत्र ७,६५० रुपये, १४.९७० ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस ७४,८५० रुपये, असा एकुण १ लाख ४२ हजार ९१६ रुपयांचा सोन्याचांदीचा ऐवज लंपास केला. मारोती स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एका आठवड्यात दोन घरफोडीच्या घटना घडल्या असून दोन्ही घटनेत सोन्याचांदीचे मुल्यवान दागिने चोरट्यांनी पळवले आहेत.
बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी दक्षता घ्यावी – पोलीस निरीक्षक सुधीर वाघ
दरम्यान , घरांना कुलूप लावून बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी जाताना दर्शनी भागातील दरवाजाला कुलूप न लावता मागच्या बाजूला असलेल्या दरवाज्यास दर्जेदार कुलूप लावावे. तसेच घरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वापर करावा. जाताना शेजाऱ्यांना व जमलं तर पोलिसांनी माहिती देऊन जावी ज्यामुळे त्यादिवशी त्या परिसरात पोलिसांकडून दक्षता घेतली जाईल.


