एसटीनेही घेतला होता पेट, कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला…
——————-
प्रतिनिधी :
——————–
वसमत येथील एसटी बस आगारातील डिझेल पंपावर बसमध्ये डिझेल टाकताना अचानक नौझल फुटल्याने झालेल्या स्फोटात पंपावरील महिला कर्मचारी भाजून गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी ता.१३ दुपारी दीडच्या सुमारास घडली. तसेच बसनेही पेट घेतला होता. मात्र जवळच असलेल्या एसटी कर्मचारी व सेक्युरिटी गार्ड यांनी तात्काळ लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. जखमी महिला कर्मचाऱ्यांस वसमत येथील प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की वसमत येथील एसटी महामंडळाच्या आगारात एसटी बस साठी आगारात समोरच्या तोंडावर डिझेल पंप आहे. गुरुवारी इतर बस प्रमाणे एम एच २० बी एल ११५५ ही बस डिझेल टाकण्यासाठी पंपावर उभी होती. यावेळी डिझेल पंपावर यांत्रिक सहाय्यक ज्योती तुकाराम काळे ह्या महिला कर्मचारी डिझेल टाकणेकामी पंपावर कर्तव्यावर होत्या. यावेळी त्यांनी उभ्या असलेल्या बसमध्ये डिझेल टाकण्यासाठी पेट्रोल पंपाचे नौझल हातात घेऊन डिझेल टाकण्याचे काम करीत असताना अचानक हातातील नौझल फुटले व मोठा स्फोट झाला. काही कळायच्या आत आगीचा मोठा भडका उडाल्याने पंप व उभ्या बसने पेट घेतला. तसेच पंपाजवळ उभे असलेल्या महिला कर्मचारी श्रीमती ज्योति काळे यांना आगीने घेरले. अंगावरील कपड्याने पेट घेतल्याचे लक्षात आल्याने तेथे उपस्थित कर्मचारी शंकर कोल्हे, दादू पवार, गणेश मामीडवार, योगेश पिसाळ यांच्यासह आगारात कार्यरत असलेले सिक्युरिटी गार्ड यांनी तात्काळ ज्योती काळे यांना आगीतून बाहेर काढले तसेच पंपाला व बसला लागलेली आग अग्निशमन उपकरणाच्या माध्यमातून तात्काळ आटोक्यात आणल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. मात्र आग नियंत्रणात आणे पर्यंत महिला कर्मचारी श्रीमती ज्योती काळे यांची शरीराची डावी बाजू पूर्णपणे भाजली गेली. तसेच चेहरा व उजवा हातही भाजल्या गेला. भाजलेल्या गंभीर अवस्थेत त्यांना वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय दवाखान्यात हलविण्यात आले आहे. या घटनेने काही काळ आगारात गोंधळ उडाला होता.


