
साहित्य, महामानवांची विचारधारा, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान आणि गणित गायनाच्या कार्यक्रमाने उत्सवांची सांगता….
आमदार राजू नवघरे यांची पत्रकार परिषदेत माहिती…..
वसमत : ता.४
सांस्कृतिक क्षेत्राचे माहेरघर असलेल्या वसमत शहरात सकारात्मक विचारप्रवाह वाढीस लागावा तसेच कला व संस्कृतीची रेलचेल वाढावी यासाठी राजू भैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने पुढाकार घेतला आहे. बुधवार ता.७ पासून चार दिवसिय वसूमती उत्सवास सुरुवात होणार असून कला व साहित्य प्रेमी नागरीकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार राजु नवघरे यांनी रविवारी ता.४ पत्रकार परिषदेत केले.
वसमत शहरास सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. मात्र मागील काही वर्षांपासून ही ओळख अंधूक होताना पहायला मिळत आहे. राज्याला व देशाला नरहर कुरुंदकर,सुरमणी प्रा दत्ता चौगूले सारखे अनेक विचारवंत व कलावंत वसमत शहराने दिले आहेत. ही सांस्कृतिक ओळख कायम रहावी अशी वसमतकरांची मनोमन इच्छा होती. रविवारी आमदार राजू नवघरे यांनी पत्रकार परिषद घेऊन वसूमती उत्सवाची घोषणा केली. त्यामुळे अनेक वर्षांनंतर कलाप्रेमी नागरीकांची भूक भागणार आहे. बुधवारी ता.७ रोजी सायंकाळी ७ वाजता साहित्यिक विचारवंत फिरस्ती फेम उत्तम कांबळे यांचे व्याख्यान आहे. तर गुरुवारी ता.८ रोजी सायंकाळी ७ वाजता बलभीम मातरे यांचे लोक माता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यावर व्याख्यान होणार आहे. शुक्रवार ता.९ आरोग्य, शिक्षण, साहित्य, पत्रकारीता, कृषी, क्रीडा, राजकारण व महिला सक्षमीकरण आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असलेल्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हे सर्व कार्यक्रम कै सुरमणी प्रा दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृहात संपन्न होणार आहेत. शनिवार ता.१० रोजी जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
या वर्षी उत्सवाची सुरुवात असून आगामी काळात मोठ्या कलावंतांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम घेणार असून कलाप्रेमी व विविध क्षेत्रातील नागरीकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार राजु नवघरे यांनी केले आहे.
