
**********
प्रतिनिधी :
**********
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहिर होण्याची शक्यता असून निवडणूक विभागाने प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहिर केल्याने त्यास गती आली आहे. त्याला अनुसरून प्रशासनाने निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. शहरासाठी नगर परीषदेची निवडणूक जितकी नागरीकांसाठी महत्त्वाची आहे तितकीच विविध पक्षासाठी महत्त्वाची असते. वसमत ‘ब’ दर्जाची नगर पालिका असून नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यांना जोडणारे मोठे शहर आहे. त्यामुळे वसमत नगर परीषदेवरील सत्ता ही हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाचा भाग समजल्या जाते. परिणामी वसमत नगर परीषद ताब्यात घेण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांकडून प्रतिष्ठा पणाला लावली जाते. एरवी निवडणूक कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर राजकीय स्टंटबाजीला सुरुवात होते पण आता मात्र चित्र बदलले आहे. पक्ष आणि गट वाढल्यामुळे निवडणुकांची चाहूल लागताच पक्षीय नेत्यांकडून ग्रीन सिग्नल मिळालेल्या भावी लोकप्रतिनिधीनी नागरीकांनाची काळजी घ्यायला सुरु केली आहे.
बुधवार ता.११ निवडणूक विभागाने प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहिर केले आणि तब्बल ९ वर्षानंतर आजी-माजी व भावी नगरसेवकांच्या चेहर्यावर हसू फुलल्याचे चित्र होते. राजकारण हे आपला मुख्य व्यावसाय केलेल्या अनेकांनी प्रभाग रचनेचे वेळापत्रक स्टेटस वर ठेवत आनंद शेअर केला. मागील निवडणूक २०१६ मध्ये झाली होती. त्यानंतर नगरसेवकांचा कार्यकाळ संपून ४ वर्षाचा काळ होत आला तरी शासन निवडणूक घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. परिणामी वाढीव ४ वर्ष नागरीकांना सांभाळताना माजी नगरसेवकांची दमछाक झाली.
भावी लोकप्रतिनिधीनी गेअर बदलला…..
नगर परिषदांच्या निवडणुकांची चाहूल लागताच भावी लोकप्रतिनिधींना वसमत शहर अचानक अस्वच्छ वाटू लागले असून रस्ते, नाली, नागरीकांचे आरोग्य यांची चिंता वाढली आहे. आपापल्या प्रभागाचे प्रश्न घेऊन प्रशासनास धारेवर धरीत मतदारांना आगामी काळातील ‘ डेव्हलपमेंट ट्रेलर’ दाखवणे सुरु झाले आहे. विशेष म्हणजे शहरात कोट्यावधी रुपयांचे विकासकामे सुरु आहेत मात्र ते मनमानी पध्दतीने सुरु आहेत. ज्या वसाहतीमध्ये लोकसंख्या आणि घरांची संख्या जास्त आहे अशा वसाहतीमध्ये रस्ते, नाल्या अत्यावश्यक असताना इतर ठिकाणी रस्ते, नाल्या केल्या जात आहेत. मात्र यावर कोणी प्रशासनाला भांडायला तयार नाही. तसेच मागील काळात कोट्यावधी रुपयांचे सौर उर्जेचे दिवे वसमत शहरासाठी आले. आजघडीला सौर उर्जेचा दिवा शोधला तरी सापडत नाही. त्या एजन्सिचाही पत्ता लागत नाही. मात्र याबाबत न.प. प्रशासनास उजेडात कोणी कधी विचारणा केली नाही. स्वच्छतेवर कोट्यावधी रुपयांचा खर्च आहे तरी शहरात दुर्गंधी आहे. शहरातील प्रमुख प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीचे बोगस बांधकाम होत आहे अशा अनेक विकास कामांच्या बाबतीत ” मी मारतो तू रडल्यासारखे कर” असे चित्र नागरीकासमोर उभे केले गेले. विविध विकास कामाचे रंगीन किस्से असताना यावर कोणी ब्र ही काढला नाही. आता मात्र इच्छूकाकडून या विषयावर आंदोलनाची भाषा बोलली जावू लागली आहे. . तसेच नागरीकांची जास्तच काळजी सुरु केली आहे. यात खरोखरच नागरीकांची सेवा करुन खिशाला झळ लावून घेतलेल्या माजी नगरसेवकांना आता नव्याने येणार्या भांडवलदार इच्छूकासोबत लढावे लागेल असेच चित्र आहे.
पक्ष वाढल्याने इच्छूकही वाढले. …
एकुण १५ प्रभाग असल्याने ३० सदस्यांसाठी नगर परीषदेची निवडणूक होईल. तसेच नगराध्यक्षाची जनतेमधून निवड होईल. २०१६ च्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एक पक्ष होते. यावेळी मात्र ते दोनाचे चार झाले आहेत. त्यामुळे शहरातील राजकीय नेतृत्वाचे चित्र बदलले आहे. महायुतीमध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट, शिवसेना शिंदे गट तर महाविकास आघाडी मध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचा समावेश आहे. त्यामुळे पक्ष वाढल्याने त्या-त्या पक्षातील इच्छूकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे उमेदवारी वरुन स्वबळाची भाषा करताना अनेक कार्यकर्ते दिसून येत आहेत. नागरीक भांडवलदारांना पसंती देतात की रखवालदारांना पसंती देतात हे येणारा काळच ठरविणार आहे.
