हिंगोली जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई ; तपासात 200 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज ची तपासणी…
——————
प्रतिनिधी :
——————
विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात दरोडे टाकणाऱ्या अंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीने पर्दाफाश करत टोळीतील आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींवर विविध जिल्ह्यांत १७ पेक्षा अधिक मालमत्ताविषयक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. फिर्यादी सतीश देवराव तानपुरे (रा. बांद्रा देवी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ मार्च रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ते मोटारसायकलने जात असताना एका स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या आरोपींनी त्यांना अडवून मारहाण केली व जबरदस्तीने ४२ हजार रुपये रोख रक्कम आणि मोबाईल फोन लुटून नेला.
या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. नीलम रोहन यांनी गुन्ह्याचा तात्काळ उलगडा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसलें यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले.
तपासादरम्यान पोलिसांनी २०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला. या टोळीचा प्रमुख आरोपी सौरभ विलास शिंदे (रा. पुणे) असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपासात आरोपी पुणे व कोल्हापूर जिल्ह्यात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सौरभ शिंदे, शुभम प्रकाश तापकीर, गजानन संजय मैंदकर, अभिजित बंडू गदळे यांचा समावेश असून, त्यांनी अनेक ठिकाणी दरोडे टाकल्याची कबुली दिली आहे. तसेच या गुन्ह्यांना मदत करणारा आणखी एक आरोपी गजानन गोविंदा गोरे (रा. वाशिम) यालाही अटक करण्यात आली आहे.
आरोपींकडून रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी व मोबाईल फोन असा एकूण सुमारे १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपींवर पुणे परिसरात १६ मालमत्ताविषयक गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले असून, हिंगोली जिल्ह्यातही यापूर्वी दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, हिंगोली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे, माधव जिव्हारे, दिलीप मोरे, प़लिस अंमलदार भुजंग कोकरे गजानन पोकळे, , शिवाजी जालमीरे, साईनाथ कंठे, हरिभाऊ गुंजकर, नरेंद्र साळवे, ज्ञानेश्वर गोरे, आकाश टापरे, दत्ता नागरे, मारुती काकडे , इरफान पठाण, प्रणिता मोरे, शिवाजी इंगोले, संदीप जाधव, पांडुरंग राठोड, धनंजय क्षीरसागर, ज्ञानेश्वर पायघन, नितीन गोरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, विकी कुंदनानी या पथकाने केली.
अंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश करून मोठा मुद्देमाल जप्त केल्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे कौतुक केले असून, जिल्ह्यातील अवैध व गुन्हेगारी कारवायांवर पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


