
जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा उत्कृष्ट पुरस्काराचे वितरण, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त शाळांचा सन्मान…
———————
प्रतिनिधी :
——————–
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांनी विविध प्रयोगशील पद्धती अवलंबून प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी बुधवार ता. १७ केले.
जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार वितरण तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-२ पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी शिवाजीराव देशमुख सभागृहात पार पडला.
यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार रामराव वडकुते, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, वित्त व लेखा अधिकारी दिगंबर माडे, डायट प्राचार्य भानुदास पुटवाड, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, संदीप सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. झिरवाळ म्हणाले की, शिक्षकांमुळेच शिक्षणाचा उच्च दर्जा राखला जातो. मात्र शाळांचा दर्जा टिकवण्यासाठी निधीची तरतूद वाढविणे आवश्यक असून यासाठी लोकसहभागातून व सेवाभावी संस्थांच्या मदतीने निधी उभारण्याचे प्रयत्न करावे लागतील. शाळा या खऱ्या अर्थाने विद्येची मंदिरे आहेत. काही गावांनी नागरिकांच्या सहभागातून शाळा बांधून दाखवल्या आहेत. राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेत इंग्रजी माध्यम व नर्सरी शाळा सुरू करण्याचे प्रयत्न होत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
शिक्षण व्यवस्था व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ करण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत. तेच भावी पिढ्या घडविणार असल्याचा आशावाद यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी आपल्या समयोचित भाषणातून व्यक्त केला.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आदर्श शिक्षकांचा गौरव हा अभिमानाचा क्षण असल्याचे सांगून, जिल्ह्यात तीन स्मार्ट शाळा सुरू असून काही शाळांची अवस्था नाजूक असली तरी अनेक शाळा उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. विद्यार्थ्यांना सैनिकी शाळा व विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळावे यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या चार परीक्षा घेण्याचे नियोजन असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात २०२२-२३ ते २०२५-२६ या चार वर्षांचे जिल्हा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-२ अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील प्राथमिक व खाजगी शाळांना पुरस्कार देण्यात आले.
यामध्ये २०२२-२३ चे पुरस्कार अशोक किशनराव कदम, श्रीमती दुर्गा विष्णुदास कुल्थे, शिवाजी मोतीराम कोरडे, रमेश अण्णा जवळेकर, विकास आनंदराव फटांगळे, श्रीमती कांचन रावसाहेब पंतगे, ज्योतीराम गणपतराव बारगजे, सोहन गुणवंत राठोड आहेत. २०२३-२४ रमेश चव्हाण, दत्ता पडोळे, गजानन चौधरी, राजकुमार मोरगे, शेख राजुद्दिन वजिरोद्दिन, सय्यद माबुद तामिजाबी सय्यद आमीन आणि २०२४-२५ श्रीमती सिंधुताई दहिफळे, बळवंत राठोड, अंगद साबणे, सचिन गायकवाड, श्रीमती अनुराधा देशमुख, राजु डोळस, श्रीमती प्रिती नथवाणी आणि २०२५-२६ कुलदिप मास्ट, श्रीमती सुप्रिया दापके, सिद्धेश्वर मुंढे, पांडुरंग पायघन, महेश बोधणे, श्रीमती विशाखा सोनवणे आदी पुरस्कार्थींचा समावेश होता.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-२ पुरस्कार प्राप्त शाळा
जि.प.प्राथमिक शाळा इडोळी ता. जि. हिंगोली (प्रथम), जि.प. प्रशाला आखाडा बाळापूर ता.कळमनुरी (व्दितीय), जि.प.के.प्रा.शा.भोसी ता. औंढा (ना) (तृतीय) तर खाजगी व्यवस्थापनाच्या अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय वसमत (प्रथम), इंदिरा गांधी कन्या विद्यालय जवळाबाजार ता.औढा (ना) (व्दितीय), जिजामाता विद्यालय वडद ता.
हिंगोली (तृतीय) असे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रुपरेषा मांडली. गत चार वर्षांपासून पुरस्कार वितरण झाले नसल्याने यावर्षी एकत्रित स्वरूपात वितरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
