
दशरथ (बापू) माचेवार प्रतिष्ठानचा उपक्रम , उपक्रमाचे दुसरे वर्ष, व्यंकटेश्वरा मंगल कार्यालयात आयोजन….
———————-
प्रतिनिधी :
———————-
वसमत – येथील दशरथ (बापू) माचेवार प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी ता.१४ व्यंकटेश्वरा मंगल कार्यालयात सायंकाळी ६ वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले असून ” जिवन सुगंधित करण्यासाठी ” या विषयावर नांदेड येथील सुप्रसिद्ध एंडोस्कोपी तज्ञ, लेखक डॉ. नितीन जोशी यांचे मार्गदर्शन होणार आहे . वसमत वासियांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आसे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे
वसमत येथील सामाजिक कार्यकर्ते कै. दशरथ उर्फ बापू माचेवार यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा वसा पुढे नेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या दशरथ (बापू) माचेवार प्रतिष्ठानच्या वतीने प्रतीवर्षी १४ सप्टेंबर रोजी एक व्याख्यानमाला आयोजित केली जाते. व्याख्यान मालेचे हे दुसरे वर्ष असून त्यात यावर्षी नांदेड येथील एंडोस्कोपी तज्ञ डॉ. नितीन जोशी यांचे व्याख्यान होणार आहे.
व्यवसायाने डॉक्टर असुनही डॉ. जोशी यांनी “आपलं पोट आपल्या हातात” आणि “कशासाठी पोटासाठी” अशी दोन पुस्तके लिहिली असून आतापर्यंत त्याच्या २१ हजाराहून अधिक प्रति विकल्या गेल्या आहेत. मानसिक आरोग्य सांभाळण्याबाबत चाललेल्या सामाजिक कार्यामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असून गरजू रुग्णांसाठी त्यांनी २०२२ पासून “एंडोस्कोपी आपल्या दारी” हे फिरते एंडोस्कोपी ऋग्णालय सुरू केलेले आहे.
आपल्या व्यस्त वैद्यकीय व्यवसायातून वेळ काढून त्यांनी अनेक लेख आणि कविता लिहिलेल्या असून रविवारचा वेळ ते सामाजिक कार्याला देतात. नैराश्याच्या गर्तेत वाहवत जाऊन व्यसनांना जवळ करणाऱ्या लोकांना सकारात्मकता आणि जगण्याचा आनंद देणारी अनेक व्याख्याने त्यांनी दिली असून अनेकांना “हे जीवन सुंदर आहे” ची अनुभुती दिली आहे.
अशा डॉ. नितीन जोशी यांचे व्याख्यान रविवारी वसमत येथील श्री व्यंकटेश्वरा मंगल कार्यालयात सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे. या व्याख्यानाचा लाभ अधिकाधिक नागरीकांनी घ्यावा असे आवाहन दशरथ (बापू) माचेवार प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
