क्रीडा संकुलाच्या पुर्णत्वासाठी सर्व समाजाला सोबत घेऊन उपाययोजना करणार – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
——————-
प्रतिनिधी :
——————-
गेल्या अनेक वर्षांपासून वसमत शहरातील जिल्हा परीषद प्रशाला व लासीन मठाचा जागेचा वाद अखेर आमदार राजू भैया नवघरे यांच्या पुढाकारामुळे मिटणार असून यामुळे लवकरच युवा खेळाडूंना क्रीडा संकुल तर लासीन मठाला गुरुवर्यांच्या समाधिची २१ गुंठे जागा मिळणार असून गेल्या कित्येक वर्षांपासून गुरुवर्यांच्या समाध्या मोकळा श्वास घेणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी याबाबत सर्व समाजाला सोबत घेऊन यावर उपाययोजना करणार असल्याचे सांगून या प्रकरणाला ग्रीन सिग्नल दिले आहे.
याबाबत माहिती अशी की, वसमत येथील तात्कालीन लासीन मठाचे मठाधिपती कमळया गुरु करबसया यांच्या नावे असलेली सर्व्हे नंबर १४०, १४१ व १४२ असलेली १२ एक्कर जमीन परभणी जिल्हा प्रांत अधिकारी यांच्या विनंतीवरून १८९३ मध्ये जिल्हा परिषद शाळेसाठी दान देण्यात आली होती. या जागेमधील शहर पोलिस स्टेशन ते कारखाना रोडवरील सध्याच्या उपजिल्हा रुग्णालयासमोरील जागेत पुर्वज गुरुवर्यांच्या समाध्या असल्याने सदरील २१ गुंठे जमीनीचा पट्टा सोडून इतर जागेचा शाळेसाठी वापर करावा असे स्पष्ट दानपत्रात नमुद करण्यात आले होते.
दरम्यान, आता आमदार राजू भैया नवघरे यांनी याबाबत पुढाकार घेतला असून सदरील राहीन मठातील पुर्व गुरुवर्यांच्या समाध्या असलेला २१ गुंठे जमीनीचा पट्टा सोडून इतर जागेत क्रीडा संकुल करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत . शुक्रवारी ता.१६ जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आमदार राजू भैया नवघरे यांनी ठेवलेल्या विकासआढावा बैठकीसाठी आले असता क्रीडा संकुलासाठी जागा पाहण्यासाठी जिल्हा परीषद प्रशालेच्या मैदानावर आले होते. या वेळी आमदार राजू भैया नवघरे, उपविभागीय अधिकारी विकास माने, नगराध्यक्ष प्रतिनिधी कन्हैया बाहेती, उपनगराध्यक्ष सय्यद इम्रान अली, गट नेते सचिन दगडू व इतर नगरसेवक व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. याबरोबरच लासीन मठाचे मठाधिपती गुरुवर्य करबसव शिवाचार्य महाराज व समाजबांधव उपस्थित होते. यावेळी आमदार राजू भैया नवघरे यांनी लासीन मठाच्या २१ गुंठे जागेबाबत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना माहिती दिली तसेच सदरील जागा पुर्वज गुरुवर्यांच्या असल्याचे सांगून सदरील जागा मठाला देण्याबाबतची विनंती केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सदरील जागेवर प्राचिन समाध्या व बारव असल्याची खात्री करुन घेतली. संबंधीत जागेबाबत गुरुवर्य करबसव शिवाचार्य महाराज यांच्याकडून कागदपत्रांचा दस्तावेज घेतल्यानंतर लवकरच क्रीडा संकुलाचा व मठाच्या जागेचा प्रश्न मिटवणार असल्याचे त्यांनी शब्द दिला.
आमदार राजू भैया नवघरे यांच्या पुढाकारामुळे प्राचीन समाध्या मोकळा श्वास घेणार असल्याने सर्व लिंगायत समाज बांधवांकडून आमदार नवघरे यांचे आभार मानले जात आहेत.


