अवैध वाळूसह १० लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त….
———————
प्रतिनिधी :
——————–
विनापरवाना बेकायदेशीररित्या वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या टिप्पर व चालकास ग्रामीण पोलिसांनी पकडून अवैध वाळूसह १० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई आसेगाव नांदेड रोडवर आसेगाव बसस्थानकासमोर गुरुवारी सकाळी ३ वाजता केली.
नांदेड जिल्ह्यातून वसमतसह तालुक्यात होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी महसूल पथकासह स्थानिक गुन्हा शाखा व वसमत ग्रामीण पोलीसांनी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे रात्री १२ ते सकाळी ५ वाजेपर्यंत वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याने या दरम्यान पोलिसांनी पेट्रोलिंग सुरू केली आहे.
त्यानुसार ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, पोलीस आमदार रामेश्वर लोखंडे, हवालदार भगवान आडे, अमलदार शहाजी बामणीकर, जयकुमार वऱ्हाडे यांनी वसमत आसेगाव मार्गावर सकाळी पेट्रोलिंग करीत असताना आसेगाव बसस्थानकासमोर टिप्पर एम एच २६ एच ७९०५ दिसून आले. सदरील टिप्परची तपासणी केली असता त्यामध्ये विनापरवाना बेकायदेशीररित्या दोन ब्रास वाळूची चोरटी वाहतूक करीत असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी चालक गणेश सिंह संजय सिंह गौर रा.समदर्गा ता. औसा जि लातूर यास ताब्यात घेतले. तसेच बेकायदेशीर वाळूसह १० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत रामेश्वर लोखंडे यांच्या फिर्यादीवरून वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार मधुकर आडे करीत आहेत.


