स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची वसमतला पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न…
———————
प्रतिनिधी :
———————
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी न मिळालेले कार्यकर्त्यांना विविध समित्यांमध्ये सामावून घेत नाराजी दूर करण्यासाठीच तिन्ही पक्षाने समित्यांची निर्मिती एक वर्षापासून पुढे ढकलली होती अशी कबुली पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी गुरूवारी ता.६ वसमत येथील पक्षाच्या कार्यक्रमात दिली.
वसमत येथील मयूर मंगल कार्यालयात स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नरहरी झिरवाळ व आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मार्गदर्शन करताना पालकमंत्री झिरवाळ पुढे म्हणाले की, सरकार स्थापन होऊन एक वर्ष झाले तरी विविध कमिट्यांची निर्मिती न केल्याने विचारणा केली जात होती. परंतु तीन पक्षाचे सरकार असल्याने अनेक संकटे येत होती. अनेक इच्छुक पैकी कोणाला एकाला उमेदवारी दिली तर नाराजी होते आणि निवडणुकीच्या तोंडावर पळवापळवी चे प्रकार घडतात. यासाठी सर्व पक्षांनी मिळून एक वर्षापासून कमिट्या स्थापन करण्याचा निर्णय थांबवला असल्याची कबूली त्यांनी दिली. नगरपरिषदांच्या निवडणुकीत ज्यांना संधी मिळाली नाही अशांना विविध समित्या ज्यामध्ये राज्यस्तरीय ते स्थानिक समित्यांमध्ये सामावून घेत न्याय दिला जाईल असे ते म्हणाले. सदरील समित्या ह्या जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात घेतल्या जातील असेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी आमदार राजू भैया नवघरे यांनी मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक व्यक्ती एक पद या धोरणाप्रमाणे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी हिंगोली जिल्हा वसमत तालुका व वसमत शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


