वसमत नगर परिषदेचे मुख्याधिकारी सय्यद रफिक यांचे आवाहन
——————-
साईनाथ पतंगे
——————-
वसमत शहरातील नागरिकांसाठी केंद्र शासनाच्या जनगणना मोहिमेअंतर्गत ‘ऑनलाइन स्वगणना’ सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन वेळेत आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन वसमत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सय्यद रफिक यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या डिजिटल जनगणना उपक्रमांतर्गत नागरिकांना घरबसल्या स्वतःची व कुटुंबातील सदस्यांची माहिती ऑनलाइन नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे जनगणना प्रक्रिया अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुख्याधिकारी सय्यद रफिक यांनी सांगितले की, नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळावर मोबाईल क्रमांकाच्या आधारे लॉगिन करून घराचा युजर आयडी तयार करावा. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांची आवश्यक माहिती भरून प्रक्रिया पूर्ण करावी. माहिती सबमिट केल्यानंतर मिळणारा युजर आयडी सुरक्षित ठेवणे आवश्यक असून, प्रत्यक्ष घरोघरी भेट देणाऱ्या प्रगणकास तो सादर करावा लागणार आहे.
ऑनलाइन स्वगणना प्रक्रिया साधारणतः १५ ते २० मिनिटांत पूर्ण करता येणार असून मराठी, हिंदी, इंग्रजीसह १६ भाषांचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच अर्धवट माहिती जतन करून नंतर पूर्ण करण्याची सुविधाही देण्यात आली आहे.
१ मे ते १५ मे या कालावधीत नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी करून राष्ट्रीय उपक्रमात सहभाग नोंदवावा. १६ मेपासून प्रत्यक्ष घरोघरी जाऊन गणना प्रक्रिया सुरू होणार असल्याने वेळेत नोंदणी करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी सय्यद रफिक यांनी केले.


