उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दहा मिनिटे आधी डॉ क्यातमवार भाजपात दाखल, नाट्यमय घडामोडींने मतदार, नागरीक अचंबित…
——————-
प्रतिनिधी :
——————
वसमतच्या राजकारणात सोमवारी ता.१७ मोठा ट्विस्ट जनतेसमोर आला. शिंदे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले तसेच पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केलेले डॉ मारोती क्यातमवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दहा मिनिटे आधी कमळ हाती घेत भाजपाच्या वतीने नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला. नगर परिषदेच्या निवडणुकीत ऐनवेळी बदललेले राजकारण पाहून उपस्थित मतदार, नागरीक थक्क झाले.
डॉ मारोती क्यातमवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यापुर्वीच काँग्रेसला रामराम ठोकत शिंदेसेनेत प्रवेश केला. शिंदे शिवसेनेला वसमत शहरात एक मोठा राजकीय चेहरा मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजीमंत्री डॉ जयप्रकाश मुंदडा व डॉ मारोती क्यातमवार यांनी पक्षाला नवी उर्जा देत इच्छूकांच्या मुलाखती घेतल्या. तसेच डॉ क्यातमवार यांनी त्यांच्या पत्नी सविता क्यातमवार यांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून समोर केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत महायुतीमधील सुर न जुळाल्याने वसमतच्या राजकारणात स्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात होती. ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस दादा गट व शिंदे शिवसेना एकत्र आल्याने स्वबळाच्या भरवशावर उमेदवारी अर्ज भरलेले सदस्य व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अडचणीत आले. परिणामी नाराज झालेले डॉ मारोती क्यातमवार यांनी ऐनवेळी कमळ हाती घेत भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. आता भाजपाकडून भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष शिवदास बोड्डेवार यांच्या पत्नी सुषमा बोड्डेवार आणि सविता क्यातमवार यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल आहेत. त्यांना पक्षाचा बी फार्म ही मिळवल्याची माहिती आहे. ऐन वेळेवर घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीने उपस्थित मतदार, नागरीक अचंबित झाले.
राष्ट्रवादीला नगराध्यक्ष पद सोडल्याने डॉ क्यातमवार नाराज…
वसमत येथील वैद्यकिय व्यवसायीक डॉ. मारोती क्यातमवार हे खासदार राजीव सातव यांचे निकटवर्तीय मानले जात होते. खासदार सातवांमुळेच ते काँग्रेसमध्ये रमले होते. मात्र खासदार सातवांच्या निधनानंतर त्यां्चे काँग्रेसमध्ये मन रमलेच नाही. त्यातच राष्ट्रवादीच्या (अजित पवारगट) नेत्यासोबत बेबनाव झाला. त्यावेळी पक्षाच्या नेत्यांनी त्यांना मदतही केली नाही. त्यामुळे नाराज होत त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून मुंबई येेथे शिंदेसेनेत प्रवेश केला.
दरम्यान, डॉ. क्यातमवार यांच्या शिंदेसेनेच्या प्रवेशामुळे वसमत तालुक्यात पक्षाला बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. तर पालिका निवडणुकीत त्यांच्या पक्ष प्रवेशाचा फायदा होईल असे बोलले जात होते. मात्र वसमत पालिकेमध्ये राष्ट्रवादी (अजित पवारगट) व शिंदेसेनेची युती झाली आहे. त्यातच नगराध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्यात आले. या संदर्भात आमदार राजेश नवघरे व आमदार संतोष बांगर यांच्यात चर्चाही झाली असून नगरसेवक पदाचे जागा वाटपही झाले.
दरम्यान, शिेंदेसेनेने नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे दिल्यामुळे डॉ. क्यातमवार पुन्हा एकदा नाराज झाले. त्यामुळे त्यांनी शिंदेसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहिर केला. त्यांनी भाजपात प्रवेश करून जय श्रीरामचा नारा देत भाजपाकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.
या संदर्भात डॉ. क्यातमवार यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. तसेच भाजपाकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.


