हिंगोली, वसमत, कळमनुरी नगर पालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ सभा …
——————
प्रतिनिधी :
——————
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र सरकारने शहर विकासाच्या कोट्यावधी रुपयांच्या योजना आणल्या आहेत. मात्र हा सरकारचा पैसा तुमच्या हक्काचा आहे मात्र यासाठी पैसे पोहचवणारे प्रामाणिक असले पाहिजे एवढंच नाही तर ते काही चुकले तर त्यांचे कान धरता आले पाहिजे मात्र या ठिकाणी माल कमवणारे लोकं आली तर तुमचं कल्याण होईल. त्यासाठी विकासवादी परिवर्तनवादी लोकांना निवडून द्या असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार ता.२७ केले.
हिंगोली येथील महात्मा गांधी चौकात हिंगोली, कळमनुरी व वसमत पालिका निवडणुकीत भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार रामराव वडकुते, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शहरी करणाचा योग्य विचार न झाल्याने काही शहरे बकाल झाली होती. मात्र देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी शहराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे स्पष्ट केले. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावा सोबतच शहर विकासाचा कार्यक्रम हाती देऊन निधी उपलब्ध करून दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आपण कोणावरही टिका करत नाही, टिका करण्याची गरजही पडत नाही कारण आपल्याकडे विकासाचा, परिवर्तनाचा कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीपुर्वी लाडकी बहिण योजना निवडणुकीनंतर बंद होईल असा आरोप विरोधकांकडून केला जात होता. मात्र जो पर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री अाहे तो पर्यंत हि योजना बंद होणार नाही. यापुुढे राज्यात १ कोटी लखपती दिदी करण्याचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण नियमानुकुल करून त्यांना घरकुलाचे २.५० लाख रुपये दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हिंगोली जिल्हयातील सिध्देश्वर धरणावरील पाणी योजना सौरउर्जेवर चालविण्यात येणार असून नागरीकांना दररोज पाणी मिळेल याची व्यवस्था होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय तिसऱ्या टप्प्यातील रस्ते काम, व्यापारी संकूलाचे बांधकाम केले जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. पालिका निवडणुक साधी नाही अनेक जण अमिष देतात मात्र त्यांच्या अमिषाला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले.


