आसेगाव ते मरलापूर मार्गे मरलापूर कॅनॉल जवळ पोलिसांची कार्यवाही, ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
——————
प्रतिनिधी :
——————-
वसमत शहरासह तालुक्यात नांदेड जिल्ह्यातून अवैध वाळूची मोठी चोरटी वाहतूक सुरु आहे. दरम्यान बुधवारी ता.१८ सकाळी ८ च्या सुमारास आसेगाव ते मरलापूर मार्गे मरलापूर कॅनॉल जवळ अवैध वाळूने भरलेले विना नंबरचे टिप्पर ग्रामीण पोलिसांनी पकडले. टिप्पर व वाळूसह एकुन ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चालक मालकास ताब्यात घेतले आहे.
अवैध वाळू वाहतूकीवर रोक लावण्यासाठी महसूल, स्थानिक गुन्हा शाखा व स्थानिक पोलिसांच्या पथकांनी कंबर कसली आहे. नांदेड जिल्ह्यातून मोठया प्रमाणात अवैध वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याने नांदेडकडून येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर सदरील पथकांची करडी नजर आहे. बुधवारी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्यासह पोलीस अमलदार मधु कराळे, विजयकुमार उपरे, नामदेव बेंगाल, साहेबराव चव्हाण यांच्या पथकाने आसेगाव ते मरलापूर मार्गे मरलापूर कॅनॉल जवळ एक विना नंबरचे वाळूने भरलेले टिप्पर दिसले. जवळ जाऊन चालकास विचारपूस केली असता सदरील टिप्परचा नंबर एम एच २६ ए डी ०६२२ असल्याचे सांगितले. टिप्पर मध्ये विनापरवाना बेकायदेशीर रित्या वाळूची चोरटी वाहतूक करताना आढळला. पोलिस पथकाने टिप्परसह ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चालक मालक असलेल्या माधव घोगरे रा. भानपुर ता.जि.नांदेड यास ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


