आठ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वसमत | साईनाथ पतंगे
वसमत शहरातील विविध गंभीर नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी हिंगोली यांना निवेदन देण्यात आले आहे. शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक सुरक्षितता आणि सार्वजनिक सुविधांबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
रिपब्लिकन युवा सेनेचे युवा जिल्हा महासचिव आकाश दातार यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक गंभीर समस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये नियमित घंटागाडी सुरू करण्यात यावी, नाले, रस्ते आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची नियमित स्वच्छता करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच आठवड्यातून दोन वेळा पिण्याचे पाणी सोडण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
वाहतुकीच्या दृष्टीने शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आसेगाव रोड, बसस्टँडजवळील सागर लॉज रोड, गवळी मारुती मंदिर रोड, कारखाना रोड डीपी ते श्रीनगर या भागांमध्ये वारंवार अपघाताची शक्यता निर्माण होत असल्याने तातडीने स्पीड ब्रेकर बसवावेत, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय शहरातील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता नियमित करण्यात यावी व परिसर स्वच्छ ठेवावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, वरील सर्व समस्या आठ दिवसांच्या आत मार्गी न लावल्यास रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व मुख्याधिकारी नगर परिषद वसमत यांनाही देण्यात आल्या आहेत. निवेदनावर आकाश दातार ,राहुल करवंदे, प्रल्हादराव जोंधळे , राजेंद्र वेडे, गजानन कांबळे, कैलास जोंधळे, सुरज वाघमारे ,नामदेव नंदनवरे, शंकर ठोके, गौतम हटकर, सुभाष इंगोले, विजय कांबळे, विजय दातार ,सुमेध खंदारे ,प्रवीण जोंधळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


