रस्ता दुरुस्ती न झाल्यास काळी फित बांधून उपोषणाचा इशारा…
साईनाथ पतंगे
वसमत :
वसमत शहरातून जाणाऱ्या.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर सुरू असलेल्या रेल्वे उड्डाण पुलाच्या कामामुळे वसमत तालुक्यातील थोरावा परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी थोरावा येथील प्रशांत लोखंडे थोरावेकर यांनी उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्याकडे बुधवार ता.२० निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गणेशपूर ते थोरावा गावाला जोडणारा मुख्य रस्ता उड्डाण पुलाच्या कामामुळे पूर्णपणे खराब झाला आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्यानेच शासकीय स्त्री रुग्णालयाकडे जाणारी वाहतूक होत असल्याने गर्भवती महिला, रुग्ण आणि नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
दरम्यान, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेकदा अपघात घडल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच पत्रकार प्रशांत लोखंडे थोरवे कर यांनी यापूर्वी शासन प्रशासनाचे लक्ष वेधत असताना भर पावसात खड्ड्यात बसून पुस्तक वाचून आंदोलन केले, त्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रस्त्यावर उभे राहून भीक मागून आंदोलन करीत जमलेले पैसे सदरील रस्त्याच्या कामासाठी प्रशासनाला मदत म्हणून दिले आणि प्रेत आंदोलन करून प्रशासनाला गांभीर्याची जाणीव करून दिली. विविध आंदोलने व संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
प्रशांत लोखंडे थोरावेकर यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, तात्काळ रस्ता दुरुस्ती व योग्य उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर १ जून २०२६ रोजी उपविभागीय कार्यालयासमोर काळी फित बांधून अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल. तसेच या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, रस्ते व वाहतूक मंत्री, जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाने त्वरित लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.


