वसमत तालुक्यातील रांजोना शिवारातील घटना…
——————
प्रतिनिधी :
——————
वसमत तालुक्यातील रांजोना गावातील शिवारात एका तरुणाचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली. गुरुवारी ता.१५ हट्टा पोलिसांच्या पथकाने सकाळी सात वाजता घटनास्थळ गाठून परिस्थितीजन्य पुरावे व इतर माहिती तपासली असता लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याचे निष्पन्न झाले. हट्टा पोलिसांनी अवघ्या दोन तासात खूनाची वाचा फोडली असून याप्रकरणी मयताच्या लहान भावाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील रांजोना शिवारातील एका शेतात तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती हट्टा पोलिसांना डायल ११२ वरून मिळाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, उपनिरीक्षक संजय केंद्रे, जमादार संदीप सुरोशे, गणेश सुर्यवंशी, ताम्रध्वज कासले, शेख हकीम, प्रितम चव्हाण यांचे पथक व स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सकाळी सात वाजता घटनास्थळ गाठले.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मृतदेहाची ओळख पटवली. सदर मृतदेह रांजोना येथील नवनाथ साळवे याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या डोक्यात दगडाने वार करून त्यांचा खून केल्याचे दिसून आले. या प्रकरणी हट्टा पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आणत असतांनाच आरोपींची माहिती घेण्यात सुरवात केली. त्यासाठी पोलिसांनी रांजोना गावात माहिती घेतली. यामध्ये पोलिसांनी मयत नवनाथ याचा लहान भाऊ गजानन साळवे याची प्राथमिक चौकशी केली असता पोलिसांच्या चौकशीमध्ये गजाननचे बिंग उघडले पडले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने खूनाची कबुली दिली अन अवघ्या दोन तासात खुनाला वाचा फुटली. पोलिसांनी आरोपी गजानन यास चौकशीसाठी ताब्यात घेतले असून या प्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.


