वसमत तालुक्यातील सुनेगाव शिवारातील घटना, ग्रामीण पोलिसात घटनेची नोंद…
——————–
प्रतिनिधी :
——————–
शेतामधून गावाकडे बैलगाडी घेऊन येत असताना रस्त्याला लागून कठडे नसलेल्या विहिरीत बैलगाडी कोसळल्याने या अपघातात दोन्ही बैलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर बैलगाडी चालक सुदैवाने बचावला आहे. ही घटना वसमत तालुक्यातील सुनेगाव शिवारात शनिवारी ता.१८ घडली आहे. या घटनेची ग्रामीण पोलिसांनी नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, वसमत तालुक्यातील सुनेगाव येथील बाबाराव रंगनाथ काळे हा तरुण आपल्या शेतामधून गावाकडे सकाळी ११ च्या सुमारास बैलगाडीने येत होता. दरम्यान रस्त्याला लागूनच असलेल्या विहिरीत बैलगाडी कोसळली. या घटनेत सुदैवाने बैलगाडी चालक बाबाराव काळे हा विहिरीच्या बाहेर निघाल्याने तो बचावला. तर तर दोन्ही बैलांचा मात्र विहिरीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती वसमत येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असता संबंधित पोलीस अधिकारी यांनी घटनेचा पंचनामा केला. तसेच पशुधन अधिकारी यांनी मृत्यू झालेल्या बैलांची उत्तरीय तपासणी केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचा बैलांच्या दुर्दैव मृत्यूने जवळपास एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यास शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे.


