तालुक्यातील नागरिकांनी एकत्र येत उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मागणी...
——————-
प्रतिनिधी :
——————-
वसमत येथील तहसीलदार श्रीमती शारदा दळवी यांच्यावर महसूल विभागाने दि. ९ एप्रिल रोजी केलेल्या निलंबन कारवाईच्या निषेधार्थ तालुक्यातील नागरिकांनी शुक्रवारी ता.१७ एकत्र येत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर, संबंधित निलंबन तात्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी करत नागरिकांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नागरिकांनी मांडलेल्या म्हणण्यानुसार, ही कारवाई एकतर्फी असून न्याय्य नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. मागील अडीच ते तीन वर्षांपासून तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती दळवी यांनी आपल्या कार्यकाळात सर्वसामान्य, गरीब व शेतकरी वर्गासाठी प्रामाणिकपणे काम केले. शेती रस्ते, पूर परिस्थिती तसेच विविध जमीन विषयक प्रकरणे त्यांनी पारदर्शक पद्धतीने आणि दलालांविना सोडविल्यामुळे त्यांची जनसामान्यात चांगली प्रतिमा निर्माण झाली होती. केवळ त्या कायद्यावर बोट ठेवून सामान्य नागरिकांचे काम करत होत्या. त्यामुळे तहसील परिसरात असलेल्या दलालांना त्या भिक घालत नव्हत्या त्यामुळे त्यांच्यावर नेहमी दबाव येत असे.
याशिवाय, रेती माफिया व मुरूम वाहतूक करणाऱ्यांविरोधात त्यांनी कठोर कारवाई केली होती. सध्या तहसील परिसरात अनेक अनाधिकृत वाळू वाहनावर कारवाई केलेली अनेक वाहने त्यांनी जप्त करून त्यांना दंड ठोठावला होता.
त्यामुळेच त्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली असावी, अशी शंका नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
“अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांवर कारवाई होत असेल, तर भविष्यात अधिकारी वर्ग सामान्यांच्या प्रश्नांवर काम करण्यास टाळाटाळ करेल,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
त्यामुळे श्रीमती शारदा दळवी यांच्यावरील निलंबन तात्काळ रद्द करून त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावे, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनावर वसमत तालुक्यातील शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत.


