अपघात रोखण्यासाठी पोलिसांचा पुढाकार; जनजागृतीसह कडक अंमलबजावणीचा इशारा
——————-
साईनाथ पतंगे
——————-
रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करून जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात हेल्मेट सक्ती आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार या मोहिमेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर हिंगोली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात वाहतूक जनजागृती व प्रथमोपचार मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन सोमवार ता.२० करण्यात आले होते.
यावेळी अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले.
गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण लक्षणीय वाढले असून, ५० टक्क्यांहून अधिक अपघातांमध्ये मोटारसायकलस्वारांचा मृत्यू होत असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. त्यामुळे दुचाकी चालक आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीस हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.
यासोबतच चारचाकी वाहन चालकांसाठी सीट बेल्टचा वापर अनिवार्य, मद्यप्राशन करून वाहन चालविण्यावर बंदी, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणे, ट्रिपल सीट प्रवासास मनाई तसेच वाहनांची नियमित तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अपघात झाल्यास जखमींना तात्काळ मदत करण्याचेही आवाहन करण्यात आले. नागरिकांनी १००, ११२ किंवा १०८ या क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळवावी, तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास पुढाकार घ्यावा, असे सांगण्यात आले. मदत करणाऱ्या नागरिकांवर कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देण्यात आले असून, पालकांनीही आपल्या मुलांना नियमांचे पालन करण्याचे मार्गदर्शन करावे, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान प्रथमोपचार व सीपीआरचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.
कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाहतूक शाखेचे अधिकारी, विविध विभागांचे प्रतिनिधी, डॉक्टर, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


