वसमत शहरातील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्याची आनंद खरे यांची मागणी…
——————
साईनाथ पतंगे
——————-
नगर परिषद प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात आणि भ्रष्ट कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी ‘हलगी बजाओ’ आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने आनंद खरे यांनी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मा.राज्यपाल यांना दिले आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वसमत नगर परिषदेकडून सध्या सुरू असलेली दलितवस्ती ते कातनेश्वरकर कॉम्प्लेक्स दरम्यानची सिमेंट रस्त्याची कामे ही लोकशाही मूल्यांना बाधा आणणारी असून सामान्य नागरिकांच्या हक्कांवर गदा आणत आहेत. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने केवळ कागदी घोडे नाचवत नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या “आंधळ्या आणि बहिऱ्या” कारभाराचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
निवेदनात पुढे विविध मागण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये रस्ते रुंदीकरणात अडथळा ठरणारी अतिक्रमणे तात्काळ हटविणे, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणे, कामांमध्ये पारदर्शकता ठेवून अंदाजपत्रक व नकाशे सार्वजनिक करणे, तसेच अतिक्रमण हटविल्याशिवाय कामे स्थगित ठेवणे यांचा समावेश आहे.
हे आंदोलन केवळ औपचारिकता नसून प्रशासनाला जाग आणणारा इशारा असल्याचे सांगण्यात आले. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून वसमत शहर अतिक्रमणमुक्त करावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, दलितवस्ती परिसरापासून ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि नगर परिषद कार्यालयापर्यंत ‘हलगु बजाओ’ आंदोलन करून निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.


